दिपमा…

मी समोर माझ्या रूम मध्ये एकांतात बसलो होतो हातात एक भक्कम दोर घेऊन त्याला एक गाठण बाधून गळ्यात टाकून थोडी ओढून पहिली आणि वरती फॅन कडे पाहताच माझा हात मागे जाऊन तो दोर फेकण्याचा तयारीत मी होतो आणि एकदम छातीत खूप मोठा खड्डा पडलाय , उदासीची एक मोठी लेहर माझ्या अंगावरून जात आहे . मी जरा चरकोलोच काय करतोय मी , फक्त सहा महिन्यात एकद्याच आयुष्य इतकं बदलू शकत ?

मी संदीप शंकरराव गवाणकर, वय वर्ष ४९ , तसा मी अनेक वर्षांपासून चिपळूण मध्येच राहत आहे.. किती वर्ष बर झाली की वीस,बावीस? उमेदीचा काळ याच शहरात गेला , अनेक अडचणींना तोंड देत अगदी भक्कम पाय रोवले मी येथे आणि कसा संदीप चा संदीप सेठ झालो समजले पण नाही. सिंधुदुर्ग मधील आचरे गाव आमचं वडिलांची वखार होती आणि कसातरी संसार ढकलत होते. तालुक्याचा ठिकाणी मी कसातरी बी. ए. झालो आणि वडिलांचा ओळखीने २०० किलो मिटर लांब चिपळूण ला वैभव देसाई या नामांकित कॉन्ट्रॅक्टर चा साईट वर मुकादम म्हणून रुजू झालो.

 एका चाळीत २०० रूपे महिन्याची रूम आणि ६०० रूपे मेस आणि इतर खर्च २०० असे हजार रूपे खर्च आणि १२०० रूपे पगार अशी सुरुवात केली. रात्रंदिवस ढोर मेहनत करत होतो आणि अश्या भिकार जिंदगितून बाहेर पडण्याचं स्वप्न पहात होतो. लेबर, प्लास्टर, सिमेंट , वाळू , पगार यात कसे दिवस गेले ते समजले नाही. देसाई सर यांचा अगदी सहा महिन्यात विश्वास संपादन केला. तसा मला चोख काम करायची सवय होती आणि त्याचा फायदा झाला , वर्षभरात पगार ७००० झाला पण खर्च मात्र तेवढंच होता. अत्यंत काटकसरीने काम करत वर्षभरात ५०००० मागे पडले . ओळखीही बऱ्याच झाला आणि देसाई साहेबांकडे काम करत एक बाहेर छोटंसं घर बांधण्याचे काम मिळाले . 

आता थोडी ओळख आणि गोड बोलण्याने माझी नवीनच उभारत असलेल्या खेडकर नगर मध्ये चांगलीच ओळख झाले . छोटी छोटी कामे करण्यासाठी लोकांचे फोन येत होते आणि त्याच बोरोबर आर्थिक सुबत्ता ही  येत होती . देसाई सरांचा एक नवीन गृहप्रकल्प विनायक सोसायटी मध्ये एक टू बि एच के फ्लॅट बुक केला या  मध्ये माझाही फ्लॅट असल्यामुळे आणि मीच तो पहात असल्यामुळे सर्व काम दर्जेदार आणि चोख होते.त्या दोन वर्षात साईट वर भरपूर झाडे ही लाऊन घेतली होती. नवीन घरात आई वडिलाबरोबर गृहप्रवेश करताना वडिलांचा डोळ्यात दिसणारे कौतुक समाधान देऊन गेले.

गावात म्हणजे आचरे मध्ये माझ्या प्रगतीचा गवगवा झाला होता परिणाम अनेक मुली सांगून आल्या आणि एक लोभस चेहऱ्याची मालती चाळके कधी गवाणकर झाली हे समजले पण नाही. लग्न होऊन तीन चार महिन्यांतच आई आणि वडील गावी गेले त्यांना या शहरात मन लागत नव्हते.

आता आमचा राजा राणी चा संसार फुलत होता . तिची साथ आणि माझे कष्ट यामुळे प्रगती होत होती हातात पैसा खुळखुळत होता. काही प्लॉट मध्येही गुंतवणूक केली आणि त्याचा  बराच फायदा ही झाला.. तिसऱ्या वर्षी घरात पाळणा हलला आणि दिपक घरात आला. पुढील वीस वर्ष कशी गेली समजले पण नाही. 

ऑफिस , कार , शहरात नाव सगळं मिळत गेलं संदीप सेठ झालो पण हे मी माझ्या मेहनतीने मिळवलं होते . चिपळूण वाढत होते आणि त्यातच ऑफिस ते घर यामध्ये कोरे चौका चांगलाच भरभराटीला आला होता. चौकात उजव्या बाजूला दोन मोठे कॉम्प्लेक्स झाले होते , शेजारीच विस्तीर्ण असे शेतकी कॉलेज ऐंशी एकरात पसरलेले . डाव्या बाजूला कलेक्टर आणि बाकी अधिकाऱ्यांचे बंगले त्याचा खाली 

महात्मा फुले शेती संशोधन केंद्र ज्यात करवंदे, जांभूळ, अवळ, चिच, कोकणी अळू यावर बरीच कामे होत होती.

आणि त्यालाच लागून सहा हजार स्क्वेर फूट मध्ये असलेला बंगला 

” दिपमा” ओसाड , अस्ताव्यस्त वाढलेले झाडी, सगळ्या आवारात पाणापाचोळ आणि एका नजरेत जाणवणारी उदासी. एखाद्या चांगल्या चित्रा वर पडलेला काळा ठिपका जसा. सगळं चिपळूण या वास्तूला टरकून असायचे. अनेक अखाईक, जादूटोणा, भूत पिशाच् अजुन काही काही… यामुळे असाच राहिलेलं हा भूत बंगला मात्र माझ्या नजरेत बसला होता . आजच्या भावाने दोन कोटी ची असणारी प्रॉपर्टी अशीच दीनवाणी पडली होती. मालकाची माहिती काढली तर मुंबईत राहणारी बोर्डवेकर यांची मालकी असल्याचे समजले , 

एकदा काम निमित्त मुंबईत गेलो असताना फोन करून बोर्डवेकर याना भेटण्यास गेलो . बराच मोठा व्याप असणारे पन्नाशी चे श्रीकांत बोर्डवेकर , तजेलदार घारे डोळे, काटक देहयष्टी .घरात नजर टाकताच श्रीमंती. दिसून येत होती.

“काय नाव आपल?,हो तुम्ही सांगितले होते संदीप , बोला काय काम काढलत?”

 श्रीकांत राव आपल्या भरदार आवाजात म्हणाले.

“सर तुमची एक प्रॉपर्टी आहे चिपळूण मध्ये” अस म्हणतच श्रीकांत रावांचे डोळे एकदम चमकले, मी विनाकारण अस्वस्थ झालो, थोड्या वेळ निरव शांततेला भेद देत श्रीकांत राव म्हणाले.

“हो आहे ना, त्याच काय?”

“म्हणलं मला त्यात इंटरेस्ट आहे जर तुमची इच्छा असेल तर”

मी जरा अवघडून गेलो होतो.

” संदीप तुला त्याची माहिती आहे ना?, अरे माझ्या आजोबा नी बांधलेली वास्तूत मी पण राहिलो नाही, ती एक शापित वस्तू आहे असा बोलबाला आहे आणि त्यात तुला इंटरेस्ट “?

“सर अहो कोठे जग गेलंय आणि आपण काय अंधश्रद्धा जोपासतो , माझा अशा भाकड गोष्टीवर विश्वास नाहीय”

“हे पण बरोबर आहे आणि आणि हे तू सर्व समजून उमजून घेत असेल तर हरकत ही नाही, मला तो विकायचा आहे तू म्हणशील त्या किमतीला देईल पण व्यवहार पंधरा दिवसात उरकला पाहिजे, सांग काय तुझी अपेक्षा आहे “?

श्रीकांत रावांनी डायरेक्ट मूळ मुद्द्याला हात घातला , मी तर गांगरून गेलो किमतीची गोष्ट होईल याचा अंदाज आला नाही. मी हिम्मत करून म्हणालो

” सर , त्याची किंमत जास्त असेल पण माझी सत्तर लाखाची तय्यारी आहे , व्यवहार लगेचच होईल”

“ये ऐकती का , जरा साखर घेऊन ये बर, “

आतून वहिनी साखरेचा डब्बा घेऊन आल्या, त्यातून एक चमचा साखर माझ्या हातावर ठेवत श्रीकांत राव म्हणाले.

” चला मान्य, त्याचा कागद पत्राची फाईल लगेचच घेऊन जा आणि गेट आणि आतील दाराची चावी पण”

मी जाम खूष झालो आणि साखर तोंडामध्ये टाकत उठलो 

.

इतका स्वस्तात आणि लगेचच झालेल्या सौद्या मुळे मी तर भराऊनच गेलो.

का कुणास ठाऊक वहिनीने साखर देताना जरा विचित्र नजरेने पाहिले असा भास झाला.  मी घरी पोहचताच मालती आणि दिपक ला जवळ बोलावून घेतलं आणि माझा निर्णय सांगितला तसा मालती म्हणाली

” अहो तो भूत बंगला आहे, असली शापित वस्तू” ?

मी जरा चिडलोच पण तिच्या सहमती साठी मी प्रेमाने म्हणालो

अग , माणूस चंद्रा वर गेलाय आणि आत्ता मंगळवार पोहचेल ,आणि आपण काय भाकड गोष्टी घेऊन बसलोय, तू शिकलेली बाई आणि अस म्हणतेस, काय दिपक तुझा आहे का विश्वास भुता खेतावर  “?

तोही हसला आणि दोघांचा आवाज थोडा नरमला, तसा मी म्हणालो

“अग इतकी प्रशस्त वास्तू या किमतीत परत कधीच मिळणार नाही, आपण काही शंका असल्यास त्याची पूजाअर्चा किंवा शांती 

करून घेऊ, मग तर झालं “

दोघांची सहमती चेहेऱ्यावर दिसत होती.

मी हवेतच होतो , स्वप्नात त्या भव्य दिव्य बंगला नाही महालच पहात होतो.

ऑफिस सायंकाळी सातला बंद करून जाताना कोरे चौक लागला दीपमा विस्तीर्ण , भव्य वास्तू दिसली बोर्डवेकर यांनी दिलेली फाईल वकीलाकडे दिली होतीच आणि चावी तर गाडीतच होती . खरेदीखत झाल्यावरच बंगाल पाहू अस ठरविलं होत पण फक्त एक नजर अतून पहावी का ? असा मनात विचार आला. गेट चा बाहेर गाडी लाऊन किल्यांचा जुडगा हातात घेतला . पुढच्या लोखंडी गेट ला जुन पुराण लोखंडी कुलपाची नेमकी चावी शोधण्यास वेळ गेला , चावी ला दोन तीन झटके देऊन थोड कुरकुर करतच कुलूप उघडले .

 गेट एक विचित्र आवाज करर ..करर .. करत थोडासा जोर देत गेट उघडले. आणि समोर स्वप्नातील भव्य महालचं होता. भव्य भलामोठा दरवाजा त्याचा समोर दोन मोठे पिलर उंचच होते , पंधरा फूट उचं असतील बहुतेक आणि दुसऱ्या मजल्या चा थोडे खाली छत . दोन पायऱ्या नंतर लगेचच तो कलाकुसर केलेला भव्य दरवाजा . दरवाजाचा एक भागात एक हत्ती कोरला होता आणि त्याचा तोंडाकडे तोंड करत दुसऱ्या भागात एक हत्ती . एकमेकांचा सोंडी स्पर्श करत होत्या. त्याचा नजरेत एक मस्तावल हत्तीची प्रतिमा अगदी खुबीने कोरली होती दोघांचा वरती छत्र त्यालासुद्धा बारीक नक्षी. पाठीवर भरजरी नक्षीकाम केलेले वस्त्र , पुढचा पाय किंचित वरती घेऊन थोडासा वाकलेला, अगदी हुबेहूब जसा काय आपण एका हत्तीचे प्रतिबिंब पहातोय. कुलूप सुधा वेगळेच आणि खूपच जुन्या जमान्यातील असावे अगदी मोठे दोन्ही बाजूने बाहेर जात वरील भागात एक आकर्षक वळण देत दुसऱ्या बाजूला जाणारे. किल्ली सुधा भली मोठी लोखंडी ती किल्ली सरकून अगदी सहजतेने कुलूप उघडले गेले, कमाल वाटली गेट चे कुलूप धक्के देऊन उघडावे लागले आणि हे अगदी सहज? तो विचार झटकतच मी दरवाजा अलंगत ढकलला. प्रशस्त हॉल मध्ये समोरच एक भव्य जिना आणि एक सात आठ पायऱ्या नंतर पुन्हा दोन जिने  विभागलेले एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला जाणारे  त्याला असणारे रेलिंग अगदी जुन्या सिनेमातील असणारा महालाचा सेट . वरती दोन भागात विभागलेला उजव्या आणि डाव्या बाजूला गॅलरी आणि तिथे काही खोल्या असाव्यात . समोर असणारी दहा फूट रुंदीची आणि अगदी वरील मजल्याचा स्लॅब ला जाऊन भिडणारी भिंत त्यावर एक भव्य तैलचित्र. एक भव्य खुर्चीत एक रूपवान खानदानी स्त्री , भरजरी लालसर कलर ची पैठणी असावी गळ्यात एकाच हार आणि त्याचा मध्यभागी पाचूचे हिरवेगार पैंडल. खुर्चीचा हातावर अगदी आत्मविशवासपूर्वक ठेवलेले हात , भरजरी ब्लावूज आणि दोन अगदी आकर्षक बांगड्या, एक पायावर दुसरा पाय दुमडून ठेवलेला आणि नाजूक पायात शोभणारी चप्पल.

मागे जोधपूरी सारखा गुडघ्याचा खालपर्यंत आलेला मखमली ड्रेस डोक्यावर जरीटोप तिचा सारखाच रूपवान पुरुष . मागे झालर असलेला पडदा श्रीमंती दाखवत होता.

एक मात्र खटकत होत की जेवढी धूळ, कोळश्टक असा असणार तसा काही दिसत नव्हतं बऱ्यापैकी स्वच्छ वाटत होत. एक अजुन जाणीव झाली की कसलातरी मंद सुवास येत होता .. कसला बर.. ओळखीचा होता हो नक्कीच तो चंदन सारखं सुवास येत होता . इतक्या वर्षांनी उघडलेला बंगल्यात सुगंध हे शक्य नाही . बाकी सर्व नंतर पाहू असं वाटलं का बरं नको वाटतेय वरती जायला?

 मी विचार झटकून परत वळून निघालो आणि काहीतरी जाणविले..हो ..हो.. नक्कीच काहीतरी जाणवले कोणीतरी रोखून बघत असल्यासारखे… थोडा अस्वस्थ झालो आणि जरा गडबड करीत बाहेर येऊन दरवाजा ढकलला , कुलूप परत लावताना थोडा अडखलो किल्ल्यांचा जुडगा सावरीत मी पुढील पटांगणात आलो आणि मागे वळून पाहिले लोखंडाचा वापर करून लावलेले नाव दिपमा , कसले नाव हे ? काय अर्थ असेल याचा असा विचार करत पुन्हा जड झालेले गेट लाऊन गाडीत बसलो , बाटलीतून पाणी पीत माझी नजर पुन्हा बंगल्या कडे गेली आणि पुन्हा असे वाटले की कोणीतरी नजरेला नजर देत पहात आहे अगदी आरपार.गाडी स्टार्ट करून चौकात येऊन डाव्या बाजूला वळण घेत घराकडे निघालो आणि मनाशीच हसलो काय पण भास ना… हे असं आपल्याला वाटण चुकीचं आहे.. इतक्या आधुनिक जगातील पुढारलेला विचारांचा मी आणि असे विचार काहीतरीच… 

घरी आपल्याच तंद्रीत पोहचलो सोफ्यात बसलो नाही की मालती ने नेहमी प्रमाणे आल्याचा चहा आणि पाणी आणले , मी जरा घाईने गटगट पाणी पिलो .

“काय हो काही बर नाही का “? मलतीचा आवाजात काळजी वाटत होती.

“नाही ग , उलट खुश आहे , येताना आपण घेतलेला बंगल्यात एक चक्कर मारून आलो”.

“अय्या खरचं , कस वाटल”?

“काय भव्य ग, अस काही आपणाला मिळेल यावर विश्वास बसत नाही, काही मित्रांनी विनाकारण शंका काढल्या त्यांना ते भव्य रूप पाहिलं ना तर पोटशूळ होईल”.

“बर कस फिलिंग वाटलं ? नवीन वस्तू आहे ना म्हणून विचारल”.

“बेस्ट, एकदम भारी”.

पण अस म्हणत असताना आवाज थोडासा घोगरा झाला , मी थोड खाखरून घेतले आणि चहा घेत विचार करत बसलो, आणि अचानक मला बोर्डवेकर ची आठवण झाली आणि लगेचच मोबाईल घेत एक फोन केला.

“नमस्कार सर , कसे अहात”?

“अरे संदीप, काय म्हणतोस.. अरे मी मजेत आहे, कागदपत्र पहिली का? सर्व बरोबर आहे ना”?

“हो सर अगदी बरोबर , एक विचारू का ? ते नाव अस कस दिपमा “?

गडगडाटी हसत बोर्डवेकर म्हणाले 

“अरे खर नाव दिपमाळ होत काळाचा ओघात ‘ ळ ‘ गळून पडला. अरे पन्नास वर्षात आम्ही तेथे पाऊल देखील ठेवला नाही”

बंगाल आतून बराच स्वच्छ कसा अस विचारावा का ? अस वाटल पण नकोच नंतर कधी विचारू.

“सर ,२६ तारखेला अक्षयतृतीया आहे त्यादिवशी खरेदीखत उरकून घेऊ , त्या अगोदर २५ लाखाचा चेक आणि बाकी येथे रोख देतो”?

“चालेल ,काही हरकत नाही , पण मी लगेचच परत निघणार आहे , येथे रात्री आमचं एक गेट टुगेदर आहे”

“सर पण माझ्याकडे जेवण घ्यावे लागेल”?

“अरे घेऊ की पण बाबा मी माळकरी आहे , सर्व शाकाहारी बर का “.

“हो सर तुम्ही नका काळजी करू”

बाजूला मालती अगदी कौतुकाने पहात होती , नवीन घराचे रेनुवेशन कसे करायचे इंटिरिअर कोण यावर गप्पा मारत अगदी मजेत मालती भरभरून बोलत होती , माझ्या कडून प्रतिसाद थोडा कमी होता का ? काय माहिती .

अक्षयतृतीया ला सकाळीच अकराला श्रीकांत बोर्डवेकर आले , थोड्याच वेळात त्यांचा हक्काने बोलण्याचा कले मुळे संकोच कमी झाला आणि वातावरण मोकळे झाले, गप्पांचा ओघात त्यांचे आजोबा अगदी तारुण्यात वारले आणि त्यामुळे  वडील दहा वर्षाचे असताना शिक्षणा साठी मुंबई ला चुलत्या कडे आले , खूप आग्रह करून देखील आजी येवढं मोठ्या बंगल्यात एकटीच राहिली . आजोबांचा अचानक जाण्याने तिने खूप मनाला लाऊन घेतले होते आणि  तिला मानसिक त्रास सुरू झाला.तिला भास होतात असे काहीतरी ती म्हणत असे . एकदा मुंबई ला आणून डॉ ना दाखविले सुधा पण आल्यापावली परत गेली आणि महिन्यातच घरात फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवली. श्रीकांत सरांचे वडील आपल्या आईचा क्रियाकर्म ला आले आणि परत मुंबईला गेल्यापासून कोणी परत आले नाही. फाशी मुळे लोकात काही लोकांनी अफवा उडविल्या की कोणीतरी स्त्री बंगल्यात दिसते.  नंतर सर्वांनी चिपळूण चा संबंध जवळपास तोडला आणि परत कोणी फिरकलच नाही.

माझ्या मनात परत विचारावसं वाटलं की आतून बंगला स्वच्छ 

कसा ? पण ते विनाकारण चेष्टेचा विषय होईल आणि मालती च्या मनात पुन्हा शंका नको म्हणून मी काही विचारलेच नाही.

खरेदी झाली दिपक ,मी आणि बोर्डवेकर मजेत जेवण केले , मालतीच्या रुचकर जेवणाची मनसोक्त स्तुती करत दुपारी तीन ला निघण्याची वेळ झाली, मी सुचविले की तुमची पडज्याताची वास्तू एकदा पाहायची का ? आणि ते खुश होऊन जातील आणि त्या निमित्याने आम्ही सर्वजण बंगला पाहू . पण तिथे जाण्यात कसलेही स्वारस्य न दाखविता बोर्डवेकर लगेचच दिलेले कॅश घेऊन गेले. आपल्या आजोबांच्या वास्तूत एक तरी शेवटची भेट न देण्याचे प्रयोजन समजलेच नाही . जाऊन द्या ज्याचा त्याचा प्रश्न असे समजावत मी तो विचार झटकला.

येत्या रविवार तिघांनी बंगला पाहण्याचे ठरविले. अगदी दुपारी दोन लाच निघालो पण दिपक ला कॉलेज चे बरेच सबमिशन होते, तो नंतर जाईल असे ठरले.

मालती खूपच उत्साहात होती , कुरकुरत गेट उघडले आणि पुन्हा अगदी सहज आतील दरवाजा उघडला. मालतीच्या हे लक्षात आली नाही.

आत जाताच मात्र मालती खुश झाली . समोरील पेंटिंग पाहताच ती म्हणाली.

” संदीप आपण येथे हे पेंटिंग काढून आपल्या तिघांचं पेंटिंग लावू, काय भारी दिसलं ना”?

“हो नक्की करू की ,आपल्याला या बंगल्याला एकदम भारी. रूप द्यायचे आहे , पैशाचा विचारही करणार नाही , हेच आपले शेवटचे घर असणार आहे”

पुन्हा मला तोच सुगंध आला, चंदनाचा …. मंद …मंद 

” मालती काही सुवास येतोय. का ? चंदन. सारखा”

“नाही बुवा !!”

म्हणजे हा सुवास फक्त मलाच येतोय की काय ?

परत मला जाणवले अरे कोणी तरी पहात आहे अगदी रोखून, माझ्या छातीत धडधड होऊ लागलं आणि मी मालती ला सांगितले.

“मालती , आता वरचा भाग नंतर पाहू मला जरा. एक अर्जंट काम आठवले आहे, चल लवकर परत”.

“अहो हे काय , कितीसा वेळ लागणार आहे ? थांबा बघूनच जाऊ, काय सुरेख जिना आहे ना”?

असं म्हणत ती जिना चढू लागली तसा मी जवळपास ओरडून च आवाज दिला.

” तुला काय बोललो समजत नाही का ? चल म्हणल की चल उगीच किटकिट  करू नको.”

मी पण माझ्या वागण्याने चमकलो आणि मालती तर आश्चर्याने बघत मागे आली.मी थोडा उदास झालो अस कधी मी तिच्याशी वागलो नव्हतो. पण मला झालेली जाणीव एक थंडगार स्पर्शासारखी वाटली.

हा नक्कीच कोणीतरी आहे येथे, माझ्याकडे पहात आहे अगदी रोखून, हा बंगला घेण्यात काही चुकले तर नाही ना? मी अस्वस्थ झालो.

झपझप चालत मी गाडीत बसलो.

” मालती खरच ऑफिस मध्ये एक महत्त्वाचं काम आहे, सुट्टी असून देखील एक क्लाएंट ला भेटणे खूप गरजेचे आहे”

“अहो ठीक ना, त्यात काय एवढं, पण संदीप आतून बंगला. स्वच्छ वाटत होता म्हणजे कोणाचा तरी वावर असावा असं, नाही का” ?

“मला नाही लक्षात अल ग”

“मागील वर्षी आपण तिघ , केरळ ला गेलो फ्लॅट बंदच होता पण आठच दिवसात नुसती धूळ झाली होती, चार तास लागले आवरायला त्यामानाने बंगला पन्नास वर्षा पासून बंद असून देखील म्हणावी तेवढी अस्वच्छ नाही वाटला रे”

“असं का ? बरं तुला येथे सोडतो तू रिक्षा न जा”

मी विषय बदलत तिला घाईने उतरवले, ती रिक्षा स्टँड वर जाताना मला एकदम भडभडून आले, कोठे जायचे आहे मला समजत नव्हते आणि परत परत येणार चंदनाच्या वासाने अजुन नैराश्य येतं होते.

तसाच एक वळण घेऊन आशिष कडे निघालो, माझा जवळचा मित्र.

घराची बेल कारण नसताना तीनदा दाबली , आतून आवाज आला , “अरे आलो.. आलो”

मला दारात पाहून आश्चर्य युक्त आनंदाने पाहून म्हणाला.

” अरे असा अचानक, काही निरोप नाही “, तुझी वहिनी गेलीय भिशी ला आता दोन तास येत नाही , मी फक्त चहा देऊ शकतो”

मला एकदम आहेस वाटलं, बर झाल घरी कोणी नाही , निवांत बोलता येईल. कोठून सुरुवात करावी समजत नाही असे वाटत असताना आशिष चहा घेऊन आला आणि जवळ बसत म्हणाला 

” संदीप , काय बिघडलं का” ?

न सांगत सगळं ओळखणारा आशिष खरच जिवाभावाचा मित्र होता.

” कस सांगावं समजत नाही रे, आपण जो बंगला घेतला ना, तेथे एकदा मी एकटाच आणि आत्ता मालती बरोबर गेलो, पण काहीतरी विचित्र वाटतंय, काय ते समजत नाही, पण कोणीतरी अगोदरच आहे तिथे आणि ते माझ्याकडे अस रोखून बघत आहे अशी जाणीव होत आहे रे, काही चुकतं नाही ना रे”

“तू चहा घे आधी”

मी गटगट करत एका दमात चहा संपविला आणि आशिष कडे बघत असताना तो हसत होता.

” संदीप , तुला तेथे भूत वगैर दिसला का? “आणि तो पुन्हा जोरात हसत होता.

मी चिडलो आहे हे लक्षात येताच तो समजावण्याचा सुरात म्हणाला.

“अरे होतो कधी भास, तुला आठवतंय का? आपण भूत नसतं हे सिद्ध करण्यासाठी स्मशानात झोपली होतो मी तरी टरकलो होतो पण तू तर एकदम बिनधास्त होता, आणि तू असा कचरलास तर काय होईल, ते काही नाही अरे जग कोठे चाललंय तू असा हिम्मतराव तू घाबरला”?

मला सुधा थोडे हसू आले पण मला नेमकं काय वाटले, ती नजर, तो सुवास हे इतंभुत गोष्टी सांगितल्या.

आशिष ने हे कस भंपक आहे आणि मी कसा मानसिक दृष्ट्या  मजबूत आहे हे पटवून दिले. माझ्या मनावरील सर्व भार हलका झाला आणि त्याने कोठे हे बोलणार नाही याचा शब्द घेऊन मी प्रसन्न मनाने घरी आलो.

आज परत जाताना मुद्दाम दिपमा नाही दिपमाळ मध्ये प्रवेश केला. मुख्य दरवाजा उघडताच पुन्हा तोच सुवास… मी पुन्हा विचार झटकून एक मागे चक्कर टाकली, आणि वरती जाऊन चारीही खोल्या पहिल्या आतील सागवान चे फर्निचर अगदी चांगल्या स्थितीत होते पण स्वच्छ ता खटकत होती. सर्व पाहून आपण पण मानसिक मजबूत आहोत असं मनाला बजावत  असताना खाली येत होतो आणि जागेवरच थिजून गेलो. समोरचा बाल्कनीत एक स्वरुपवान स्त्री स्पष्ट दिसत होती बहुतेक त्या पेंटिंग मधीलाच असावी . गुलाबी काठा पदराची भरजरी साडी, ठसठशीत कुंकू चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास आणि मंद स्मित. हा  भास नाहीय हे खरंय याची जाणीव झाली. जागेवरून एक इंचे पण हलने शक्य नाही हे लक्षात आले, संगमनावरी फारशी चा थंड स्पर्शाची जाणीव होत होती. नाही… नाही हा भास आहे असे मनाला बजावत, येणाऱ्या सुगंधा कडे दुर्लक्ष करत मी माझे शरीर अक्षरशः ओढत खाली जात होतो आणि ती अचानक बोलली .

“तू येणार ,माझ्या घरात”?

आवाज मात्र घोगरा आणि तिला न शोभणारा होता. मी नखशिखांत ओला झालोय याची जाणीव झाली , हिम्मत करून मी उघड्या दरवाजातून बाहेर आलो , दरवाजा लोटला पण कुलूप न लावताच मी मेन गेट कडे आलो कस तरी करून गेट लाऊन गाडीत बसलो. हातापायात बेड्या ठोकल्या अस वाटत होत. उसन अवसान आणत कसा तरी घरी आलो.

“मालती , पाणी दे ग आधी”

मी सॉफ्यात अग दुमडून बसलो , काहीतरी बिघडलं याची जाणीव लगेचच मालती ला झाली. कपाळावर हात ठेवत ती म्हणाली

” अहो बर नाही का? ताप पण दिसतोय, डॉक्टर कडे जायचं का ?

“नको , मला चहा दे , एक क्रोसिन् दे , थोडा आराम करतो , थंडी पण वाजते आहे मला.”

“येवढ्या उन्हाळ्यात थंडी “? अस पुटपुटत तिने चहा ठेवला.

थोडा आराम करून थोड बर वाट्याला लागलं आणि नेमकं काय घडलं याची उजळणी करत होतो.

” नाही…नाही हे शक्य नाही, तो भासच असेल”

“अहो काय बोलता अहात तुम्ही एकटेच”?

मालती मात्र आता घाबरली .

“मी सावरत म्हणालो अग थंडी मुळे असेल , आता गोळी घेतली आहे, वाटेल आराम”

तिने शंकेने मला पघारून घालत बाहेर गेली, काय करावे ते समजत नव्हते. आपण पाहिलं, ऐकलं तो भास की खर ? … नाही नक्कीच ते खर होत, ते मंद स्मित डोळ्या समोरून जात नाही याची जाणीव झाली.

रात्री जेवताना मालती काळजीत होती , वातावरण थोड मोकळं करण्यासाठी मी काहीतरी बोलत होतो आणि ते सुधा मला जमत नाही याची जाणीव होत होती.

तेवढ्यात दिपक म्हणाला.

“बाबा , मी जातो उद्या आपला बंगला पाहायला, तुम्ही किल्ल्या देऊन जा”.

“अरे उद्या नको , मी जुडगा ऑफिसलाच विसरलो , नंतर जा”

“कश्याला? मी ऑफिस मधून चावी घेऊन जातो , मग तर बस ना”

त्याने या संकटात जाऊ नये यासाठी माझी खटपट चालू होती.

चावी माझ्याकडेच होती पाहू उद्या असा विचार करत मी झोपलो.

सकाळीच उठलो ते आशिष आणि त्याचा बरोबर आमचे फॅमिली डॉक्टर केंद्रे पाहून मी मालती कडे पाहिले, तिचा चेहरा वर काळजी दिसत होती.

” डॉ हे झोपेत रात्रभर बरळत होते” 

मी कशी रात्र काढली तेच समजत नाही.

आशिष माझ्याकडे मागील मे जे त्याला बोललो होतो त्या अनुषंगाने पहात होता मी नजरेने काही बोलू नकोस हे खुणावले.

डॉक्टरांनी बिपी, ताप तपासला आणि. हसत म्हणाले.

” काही नाही साधी ताप थंडी आहे, कामाचा ताण असेल दोन दिवस आराम सक्तीचा, आणि हे औषधे घेणे “अस सांगत दिपक कडी चिठ्ठी दिली.

डॉक्टर जाताच मालती नाष्टा करण्यास गेली आणि दरवाजा लावताच आशिष ने विचारले ” काय झालेय, तेच भास का”?

मी परत सर्व डिटेल मध्ये सांगितले..

आशिष हे सर्व कसे शक्य नाही, विज्ञान यावर बोलत होता आणि मला एखाद्या मनोसौपाचार तज्ञ ची मला कशी गरज आहे हे सुचावित होता.

“आशिष, मी काय वेडा झालोय का ? काहीतरीच , मी सांगतो ते खरं आहे”

” म्हणूनच तुला गरज आहे, अरे हे काही वाईट नाही खूप जन या तज्ज्ञ ची मदत घेतात”

मी हतलाब झालो होतो. कस समजून सांगू ?  कोण माझ्यावर विश्वास ठेवणार? मी अजुन खोलात जात आहे, मला वाटले की मी एका निमुळत्या आडात जातोय आणि माझ्यात नाकातोंडात पाणी जातंय मी ओरडून मदत मागतोय आणि मालती, दिपक आणि आशिष मोठ्याने हसत आहे, त्यांना वाटतंय मी चेष्टा करतोय पण खरच मी अडचणीत आहे हे मी मोठ्याने ओरडून सांगत आहे पण कोणी मदत करत नाही आणि मी हळुहळू बुडत आहे.

आशिष जवळ जवळ ओरडून म्हणाला , 

“ये कोठे तू ट्रान्स मध्ये गेलाय एकदम शून्यात पहातोय , कधीच मी बोलतोय तुझा शी “

मी काहीच बोललो नाही डोक्यावर चादर ओढत मी त्याच्याकडे पाठ फिरवली.

रात्री कधीतरी खूप तहान लागली, पाणी पिऊन कॉट वर आलो की मला जाणवले परत ती माझ्याकडे पहात आहे , मी डोळे वरती करून पाहिले माझ्या रूम मधील खुर्चीवर ती बसली होती. तीच नजर , तोच आत्मविश्वास आणि परत तोच चंदना चा सुगंधी सुवास.

यातून मलाच मार्ग काढावा लागेल, मलाच हिम्मत बांधावी लागेल नाहीतर ही बाई सगळं माझं कुटुंब उद्ध्वस्त करेल.

या विचाराने मला तरतरी आली , गळ्यातील अव्हांड गिळत मी मोठ्याने आत्मविश्वासाने बोललो.

“का पिच्छा करतेय माझा, मी पैसे मोजून घेतलाय तो बंगला आणि नाही सोडणार , काय करणार तू बोल काय करणार”

ती फक्त मंद स्मित करत होती तसा मी चिडलो आणि अजुन आवाज वाढवीत म्हणालो.

“बोल की , का नुसती बघत आहेस, बोल चांडळीन…”

आणि मला मालती गदागदा हलवित होती ” अहो काय झाले, दिपक ये इकडे एकदा… दिपक… दिपक_”

आता दोघे माझ्या समोर घाबरून पहात होते, मालती चा डोळ्यात अश्रू चा धारा लागल्या होत्या.

त्यांचा कडे पाहत मी म्हणालो.

“ती बघ खुर्चीत बसली आहे चंडळीन कुठली… ती बघ …”

दोघांनी खुर्ची कडे पहात होते पण. काही तरी दिसतेय हे त्यांना समजत नाही हे मला समजले.

” अग इकडे खुर्चीत बघ बावळट, तिकडे नाही या खुर्चीत”

आता दिपक पण रडत बोलला.

“बाबा, अहो तिथे कोणीच नाही, तुम्ही असे काय करताय”?

आता याना कस समजून सांगू, ती समोरच बसलेय , छद्मी हास्य करत.

अरे कोणीच का नाही पहात? नीट बघा डोळे फाडून.

माझा आवाज तुम्हाला येत नाही का? आणि हे दोघे तिकडे त्या बाई कडे पाहायचे सोडून माझ्या गळ्यात पडून का रडत आहे , मला तर काहीच समजत नाहीय कस सोडू हे कोड , आणि अचानक ती गायब झाली. मी पण खूप थकून गेलो कितीही समजून सागतोय पण त्यांचा डोक्यात माझं म्हणणं घुसत नहीं. माझे डोळे मिटत आहेत आणि झोपेचा  अंमल मला चढत होता आणि मी झोपी गेलो.

सकाळीच परत आशिष हजार होता सगळेच हादरून गेल्या सारखे माझ्याकडे पहात होते. परत आशिष ची टेप सुरू झाली आणि मला समजलं की मला मानसोपचार तज्ञ कडे जावेच लागेल. त्यांना मी वेडा झालो  अस वाटतंय काय?

अरे मी नाही तुम्ही सगळे वेडे अहात हे मला त्यांना सांगायचे होते पण मी निमुटपणे त्याचा बरोबर जात होतो.

मनोसोपाचार साठी डॉ. गिरीश हळदे यांचा कडे आशिष आणि मालती सोबर गेलो , मी काहीच बोलणार नाही हे ठरविले होते कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही याची खात्री झाली होती .दोघांचा डोळ्यात स्पष्ट काळजी दिसत होती,एकाच्र दिवसात मालती चा डोळ्या खाली सुरकुत्या आणि काळेपणा दिसत होता. त्यांचा साठी तरी मला उसन अवसान आणणे गरजेचे वाटले. अनेक पेशंट मी निहाळत होतो येथे कधी मला यावे लागेल असं वाटलं नाही. सर्वांचा चेहऱ्यावर काळजी दिसत होती . आमचा नंबर आला डॉ हाळदे यांनी. स्वागत केले, 

“बोला काय अडचण आहे “?

अस म्हणायच अवकाश की मालती चा डोळ्यात धारा सुरू झाल्या. मी कसा स्वतः शीच. बोलतोय, रूम मध्ये कोणी नसताना याना कशी एक बाई दिसतेय, चंदन चा सुगंध.. वगैरे वगैरे… सांगत होती आणि मधूनच हमसू हमसून रडत होती. त्या दोघांना बाहेर जायला सांगून डॉक्टरांनी माझ्या कडे पहात म्हणाले

” हे पहा संदीप , या लोकांवर मी विश्वास ठेवणार नाही मी तुमचं ऐकणार आणि मला बरोबर वाटल्यास तुमच्यावर देखील विश्वास ठेवणार, ठीक के ,तरे मला सर्व गोष्टी सविस्तर सांगा पाहु.”

मला खूप आनंद झाला कोणीतरी माझं ऐकून घेताय. मी पहिल्या भेटी पासून अगदी कालचा प्रसंगा बद्दल सर्व गोष्टी इतंभूत सांगितल्या.

अजुन काही जुजबी प्रश्न. विचारून त्यांनी मला भली मोठी औषधाची यादी दिली. मालतीला कोणती औषधे कधी घ्याची हे समजून सांगितले.

मी विचार करत होतो डॉक्टर ना खरच माझे अनुभव खरे वाटले का ? मग त्यांनी औषधे का दिले ? डोक्याचा पार भुगा होत होता.

एवढ्यात तिर स्त्री परत दिसत नव्हती. घरात बहुतेक. थोड वातावरण. बदललं , मला मात्र बाहेर. जाण्यास मज्जाव होता , दिवसभर दोन दोन तासांनी औषध आणि जेवण झोप अस. रूटीन  चालू होते.

माझ्या मागे यांची चर्चा होत होती आशिष ची रोज एक चक्कर आणि उपदेश चालू होता. मी बोलत असताना मात्र फक्त वरच्या वर माझं ऐकणं आणि समजूत काढायचं चाललं होत . माझ्यातला संताप नुसता घुमसत होता. मागील दोन दिवस मी रागाने गोळा घेतल्याचं नाही . आज सायंकाळी कॉट वर बसून होतो मालती ने पोहे आणि चहा आणला होता .

“कस वाटतंय आता”?

“अग मला काय झालंय , तुम्हीच मला वेडा ठरव्याच ठरविलं आहे का ? मी माझ्या हिंमतीने आणि डोक्याने हे साम्राज्य उभे केले आहे आणि आता तुमचा समोर केविलवाणा झालो आहे, नाही तुम्ही मला केविलवाणं केलं आहे.”

“अहो डॉक्टर काय म्हणाले , खूप विचार करायचा नाही , तुम्ही आराम करा बर”.

ती उठून बाहेरचा हॉल मध्ये जाऊन टीव्ही पहात बसली, बहुतेक सर्वच जण मला टाळत होते.

संध्याकाळचे सात वाजले , उदासी ने मी अजुन खचत चाललो होतो, मला या टाळण्याचा कंटाळा आला होता. ऑफिस मधील सर्व काम दिपक बघत होता मी काही विचारले की “तुम्ही तान घेऊ नका, आराम करा.”या वाक्याने मला अजुन मनस्ताप होत होता पण कोणी समजून घेत नाही याचेच दुःख जास्त होते.

जेवण करून पुन्हा मालती ला समजणार नाही अशा पद्धतीने परत गोळ्या घेतल्या नाही . बाथरूम मध्ये जाण्याचा बहाण्याने गोळ्या फ्लश केल्या. झोपण्याचा प्रयत्न चालू होता , मालती मात्र लगेचच झोपेचा अधीन झाली , तिचा झोपण्याने मात्र  मला तर त्रास होत होता.

अचानक रात्री थोडीशी जाग आली , आणि मला जाणवले की मला परत चंदन चा सुवास येत आहे, याचा अर्थ ती बय्या परत आली वाटतं. आज मी पूर्ण तय्यारी केली होती आज तिला कसल्याही परिस्थितीत सोड्याच नाही. ती अगदी सहज मंद चालीने येऊन पुन्हा माझ्या खुर्चीत बसली , तीच नजर अगदी आरपार जाईल अशी, तेच त्रास देणारे स्मित. मी तिचा नजरेला नजर दिली आणि आता आपण घाबरतच नाही हे तिला सांगत होतो. तिचे फक्त बघणे मला चीड आणत होते.

” ये हडळ , मी नाही घाबरत तुला , काय करशील तू , हे सर्व माझ्या कष्टाचे आहे आणि मी हे सोडणार नाही”

माझ्या उंच आवाजाने तिच्यावर काहीच फरक पडला नाही पण मालती घाबरून बाहेर जाऊन दिपक ला घेऊन आली.

” बाबा , काय करताय तुम्ही “?, अहो किती छळणार तुम्ही आम्हाला, विट आलाय तुमच्या या वागण्याचा”.

ती समोरून पहातीय आणि माझी माणसं मात्र माझ्यावर आरोप करतात.

” अरे मुर्खा, ती हडळ बसलीय समोर तिला  हाकला आधी , आणि तू चोंबडे हा तूच चोबडे माझी बायको असून या मुर्खाला साथ देतेय”

माझा पारा चढला होता, त्यात ती समोर फक्त हसत होती. माझ्या बाजूला काचेचा पाण्याचा जग होता तो घेऊन मी माझी ताकत एकवटून तिचा दिशेने फेकला,आणि कस काय मध्येच मालती आली तिचा डोक्यातून रक्ताची धार सुरू झाली , माझा नेम चुकला का? म्हणून मी पुन्हा डोक्या कडील बदाम तेलाची मोठी बाटली हातात घेतली आणि मोठ्याने ओरडत त्या बाईचा दिशेने फेकणार तोच दिपक ने माझा हात पकडला ,त्याचा मजबूत पकडीने मला हालचाल करता येत नव्हती.जो माझ्या नजरेचा धाकात होता तो मला पकडत आहे याचा खूप राग येत होता, मी पूर्ण ताकदीने आणि आवेशात येऊन झटपट करत होतो. ती मात्र मंद स्मित करत माझी मज्जा. पहात होती. त्या हाडळणीने माझी बायको, मुलगा माझ्या विरोधात उभा केला होता. माझा विरोध थांबत नाही हे पाहून मालती पण माझ्यावर खेकसत हॉल मध्ये गेली आणि एक मजबूत दोर आणला आणि दिपक ला म्हणाली .

” बांध त्यांना, त्याशिवाय हे जागेवर येणार नाही”.

दोघांनी एकत्र येऊन जबरदस्तीने माझे हात बाधून , पायाला एक पिळ देऊन मागे कॉटला बाधून टाकले , मला हालचाल करता येत नाहीय हे पाहून खुर्चीत बसून ती मात्र मंदपणे हसत होती.

” अग चाडळीन , तुझ्या मुळे होतेय सगळं , हे माझे कुटुंब माझ्या शब्दाचा बाहेर गेले नाही आणि आज मला बाधून ठेवत आह, मी नाही सोडणार तुला”.

मालती चिडून समोर कोपऱ्या पासून  हात जोडत मोठ्यांनी ओरडत होती.

” अहो बास करा हा तमाशा , आमची सहनशीलता संपली आहे, कोणी नाही या रूम मध्ये , हजारदा सांगितलं तरी परत तेच  तेच, वास येतोय म्हणे आणि ती बसलीय समोर, काही नाही तुमचा डोक्यावर परिणाम झालाय “.

तिचा गळा दबाव अस वाटत मी झटपट करत होतो तशी ती अजुन किंचाळून माझ्यावर आरोप करत होती. जिला एवढं प्रेम केलं, तिचा कसलाच शब्द पडून दिला नाही ती माझ्यावर डाफरत होती. ज्याला तळ हाताचा फोडा प्रमाणे जपला तो मला बाधून टाकतोय. मी पूर्ण निराश झालो आणि कधी माझे डोळे मिटले ते समजलेच नाही. सकाळीच आशिष , दोन तीन दनगट लोक आले आणि मी काही म्हण्याचा आता त्यांची पाशवी पकड माझ्यावर पडली आणि अक्षरशः मला उचलत , फरफडत माझा मोटकुळ करत खाली घेऊन ॲम्बुलन्स मध्ये ठेवले . कॉलनीतील सर्वजण हे बघायल गोळा झाले , माझा रागाचा पारा चढला आणि मी पण त्यांना शिव्या देत होतो.

कोठे घेऊन चाललेत हे मला….. ? 

तेवढ्यात एकाजनाने कसले तरी इंजेक्शन दिले आणि थोड्याच वेळात माझे डोळे झाकले गेले.

ॲम्बुलन्स मध्ये उन्हाची तिरीप येत होती, मी क्षीण आवाजात वेळ विचारली , दिपक तुटक आवाजात म्हणाला “बारा वाजलेत”

जवळपास सहा तास प्रवास झाला होता, कोठे घेऊन चालेत ,  भुकेने जीव व्याकूळ झाला होता, तहान लागली होती मी थोडी हालचाल केली तर माझ्या लक्षात आले की मला बाधून ठेवले आहे. दिपक ने बाटलीतील पाणी माझ्या तोंडत दिले , मला आता बर वाटत होते पण माझे कोणी ऐकणार नाही याची जाणीव झाली मी तसाच पडून राहिलो आणि तेवढ्यात ॲम्बुलन्स थांबली. मला खाली उतरून घेतले आणि समोरच मला कमान दिसली तिथं जे लिहल आहे ते कष्टाने मी वाचण्याचा प्रयत्न केला.” प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे”उजवा बाजूला इंग्लिश मध्ये” मेंंटल “आणि डाव्या बाजूला ” हॉस्पिटल ” असे लिहाले होते. यांनी मला वेड्यांच्या इस्पितळात मध्ये आणले होते. गुलाबी रंगााचा त्या कमानिने माझा रंग उडवून नेला. आता मध्ये खाली आकाशी आणि वरचा बाजूला पांढऱ्या रंगााने असलेली दगडी भिंत मला कायमचे बंंदिस्त करतील याची मला जाणीव झाली. मी लाकडी बााकावर हताश होऊन बसलो.

दोन वॉर्ड बॉय मला घेऊन जात होते मालती आणि दिपक वळून परत जाताना मी पहात होतो.

दोन महिने मध्ये मी बरेच स्वतः ला सावरले डॉक्टरांनी खूप प्रेम लावले. मी आता खूपच शांत झालोय आणि लवकरच मी बरा होऊन घरी जाईल यामुळे मी अजुन समजुदर होण्याचे ठरविले. आठ दिवसात दिपक आणि आशिष मला घेऊन जाण्यासाठी आले.

” मालती नाही आली”?

“काही गरज वाटली नाही” दिपक आपल्या कोरड्या आवाजात बोलला. मी कोषिशिने स्वतःवर नियंत्रण ठेवत शांतपणे गाडीत बसलो एक धाब्यावर मुकाट्याने जेवून रात्री घरी पोहचलो . आशिष ने आता मी कसा बरा झालोय आणि पुन्हा कसे जुने दिवस येतील यावर बोलत होता.मी शांत पणे रूम मध्ये गेलो , मालती तुटक बोलत होती. मी झोपलो आणि कधीतरी उठलो तर मी एकटाच रूम मध्ये होतो , बाहेर आलो तर मालती हॉल मधेच टिव्ही पहात झोपली होती. मी हळूच टिव्ही बंद केला आणि परत रूम मध्ये गेलो . खाली बसलो झोप येत नव्हती सहज कॉट खाली पाहिलं तर तो रोप मला दिसला ज्याने मला बांधले होते . माझा कसा अपमान केला त हे तो ओरडून सांगत होता. मी मात्र प्रेमाने ती जाडसर दोरी हातात घेतला . डोक्यात विचारांचं काहूर माजलं होत विचार करता करता कधी मी त्याची गाठणं बांधली समजले नाही.अलगद तो दोर मी शांत पने फॅन ला बांधला आणि खुर्ची अगदी फॅन खाली घेऊन त्यावर चढलो. ….


मी प्रसाद म्हात्रे पुण्यात इन्फोसिस मध्ये आहे आज एक जाहिरात पाहिली .” चिपळूण मध्ये प्रशस्त बंगला विकणे आहे” संपर्क आणि मोबाईल नंबर . इतकी त्रोटक जाहिरात कधी पाहिली नव्हती . कोकणात निसर्गाचा कुशीत आपल एक सेकण्ड होम असावं हे खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण करावं का ? बँकेत असलेला भला मोठा बालन्स परवानगी देत होता. सहजच फोन केला तर कोणी दिपक बोलला . अपेक्षा अगदीच कमी म्हणजे. पन्नास लाख फक्त मी रविवारी येण्याचे सांगून माझा मित्र साहिल ला सांगितले . बरोबर जाऊन  पाहून तर येऊ असा विचार करत आम्ही रविवारी चिपळूण ला पोहचलो . दिपक ने चावी दिली आणि तुम्ही पहा आणि घरी या अस सांगून तो गेला. बाहेरून पाहून आम्ही जाम खूष झालो . “दिपमा “ काहीसं विचित्र नाव वाचून आम्ही आतमध्ये गेलो सर्व पाहून तर साहिल उल्हासित झाला . ही वास्तू घेयाचीच हे ठरून आम्ही बाहेर पडलो. मी सहजच साहिल ला म्हणालो.

” साहिल , तुला काही वास आला का ? म्हणजे बघ चंदन सारखा”

“नाही ब्वां” 

मी तो विचार झटकून दिपक चा घराकडे निघालो……

Sketch by Swapnil Burhade

The sketches are imagined and brought to life by the very talented Swapnil Burhade. He personally read the story, studied it in details and then iterated a few designs. He’s truly a very talented artist. Contact him on below email id for all your design projects. knotdevelopers@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *